१० वर्षे राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व ५ वर्षे सत्ताधारी सरकारचे लोकप्रतिनिधी असताना, ज्यांना राहुरी तालुक्यातील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारतीचा साधा प्रश्न समजला नाही, त्यांना आता निवडणूक जवळ येताच आमचा श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसतो.
तालुक्यात आलेल्या विखे- कर्डिले यांना तालुक्याच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. हे दोघे राहुरीची बाजारपेठ कशी उद्ध्वस्त होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे, अशी जहरी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
आमदार तनपुरे यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. राहुरी शहरातील अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या बरोबर झालेल्या बैठकीची ते माहिती देत होते.
माजी मंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिलेंनी पुरावे मागितले होते, तर मग हा घ्या पुरावा असेही आ. तनपुरे म्हणाले. मी पुराव्यासह बोलत असतो. चुकीचे बोलत नाही. बैठकीला राज्याचे आरोग्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हा शल्य चिकित्सक घोगरे होते.
त्यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामबाबत माहिती देताना ते म्हणाले, की राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीच्या कामासाठी १७ कोटी ३२ लाख ६० हजार, ३० खाटांची नवीन इमारत बांधण्यासाठी १७ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असता महसूलमंत्री विखे यांनीही सांगितले होते की राहूरीतील ग्रामीण रुग्णालय शहरातच होणे गरजेचे आहे. याबरोबरच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही आ. तनपुरे यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मांडल्याचे म्हटले होते. कुठलेही शासकीय काम करत असताना पाठपुरावा करावा लागतो.
कर्डिलेंना १० वर्षांच्या कार्यकाळात काही करता आले नाही. त्यांना जनतेने या कारणामुळेच नाकारले. आता पाच वर्षांनंतर झोपलेले का जागे झाले? असा सवाल आमदार तनपुरे यांनी विचारला. राज्य महामार्ग कसा का असेना, या मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय होणे महत्त्वाचे आहे.
विरोधकांना त्यांच्या भागातील पाणी योजनेचे काम करता आले नाही. नगर तालुक्यातील इमामपूर, मांजरसुंबा आदी गावे या योजनेत नव्हते. मी त्या गावांचा योजनेत समावेश केला. त्यांच्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही, ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाहेरील लोकांनी येऊन आरोप करणे, मी याकडे टाईमपास म्हणून लक्ष देतो असे आ. तनपुरे म्हणाले.
व्यापाऱ्यांवर दबाव नाही
राहुरीच्या व्यापाऱ्यांवर नगरच्या व्यापाऱ्यांसारखा दबाव निश्चित नाही. उलट भूमिपूजन या दोन नेत्यांनी केले, त्याच वेळी राहुरीच्या व्यापाऱ्यांनी माझी तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची भेट घेऊन सत्ताधारी गटाच्या या दोन नेत्यांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.