अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली.पुरंदरे यांच्या निधनान महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवणारे शाहीर काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आ. विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास आपल्या ओजस्वी वाणीतून आणि सिध्दहस्त लेखणीतून समोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले परिश्रम कोट्यावधी शिवभक्तांमध्ये इतिहास जिवंत ठेवण्यासाठी कारणीभूत ठरले.
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्याचे संशोधन करण्यात पुरंदरेंनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून केवळ आपल्या देशातच नाहीतर परदेशातही महाराष्ट्राचा ऐतिहासिक,
सांस्कृतिक ठेवा असंख्य पिढ्यांपर्यंत पोहचविण्याच्या महत्वपूर्ण काम त्यांनी अखेरपर्यंत केले. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा असंख्य पुरस्कारांनी बाबसाहेबांच्या कार्याचा गौरव झाला असला
तरी सामान्य माणसाच्या मनात शिवशाहीर म्हणून असलेली ओळख चिरंतन काळ स्मरणात राहील. असे म्हणत विखेंनी पुरंदरेंना श्रध्दांजली अर्पण केली.