अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आघाडी सरकारचा टांगा पलटी झाला ना, की पुन्हा आम्हीच आहोत. त्यामुळे तुमच्या नियमातच काम करा. उगाच शेतकऱ्यांना डिवचू नका.
आठ दिवसांत तोडलेले वीजजोड पुन्हा न जोडल्यास कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीजबिलमाफीसाठी महावितरण कार्यालयावर काढलेल्या एल्गार मोर्चात ते बोलत होते. शहरातील तीन बत्ती चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला.
विखे पाटील म्हणाले, की वसुली करता करता सरकारमधील मंत्री तुरुंगात गेले आहेत. पोलिस अधिकारी फरार आहेत. अनेक जण ईडीच्या कार्यालयात खेटा घालत आहेत.
निवडणुकीत दिलेल्या शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करावी. पुढे बोलताना विखे म्हणाले, मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कवडीचीही मदत केली नाही.
दारूवरील कर माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकत नाही. वीजबिलासाठी रोहित्रे बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धराल, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.