AhmednagarLive24 : राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप घडवून आणलेल्या पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकरी संपाची तयारी सुरू झाली आहे. तेथील शेतकऱ्यांनी विविध प्रश्वांवर पुन्हा एकदा संपाची तयारी सुरू केली आहे.
त्यासाठी नुकतीच प्राथमिक बैठक झाली. सोमवारी ग्रामसभा असून त्यात अंतिम निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील पुणतांब्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
एवढेच नव्हे तर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला.यावेळी संपासाठी पुढाकार घेणारे यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, भास्करराव चव्हाण, उपसरपंच महेश चव्हाण, शाम माळी, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र थोरात, सुभाषराव कुलकर्णी, यशवंत चौधरी, शुक्लेश्वर वहाडणे, संगिता भोरकडे, अॅड.चांगदेव धनवटे उपस्थित होते.
शेतकरी संपाचा निर्णय सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेत होणार आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी यासंबंधी अद्याप कोणताही भूमिका जाहीर केली नाही. किंवा त्यावर काही भाष्यही केले नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यासंबंधी मागणी मात्र केली.
‘केंद्र सरकारने मोफत लस दिल्यामुळे राज्य सरकारचे ६ हजार कोटी रुपये वाचले आहेत. हा पैसा शेतक-यांना मदत म्हणून द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली. ’बांधावर जाऊन ज्यांनी शेकतक-यांना मदतीच्या मदतीची आश्वासने दिली त्यांनीच आता शेतक-यांना वा-यावर सोडून दिले आहे.
सरकारचे धोरण फक्त बिल्डरधार्जीणे आहे. सरकार सत्तेतील आमदारांनाच निधी देत नाही तर शेतक-यांच्या योजनांना केव्हा देणार? सध्या राज्यात निधीअभावी कृषी योजना ठप्प झाल्या आहेत. कृषी विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे थांबला आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांना कोणतीही मदत सरकारकडून होत नाही. नियमीत कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याच्या घोषणा आत्तापर्यंत तीनवेळा झाल्या पण हे सरकार शेतक-यांच्या खात्यात जमा करु शकलेले नाही,’ असे आरोपही त्यांनी केले.