अहमदनगर बातम्या

लंकेची खासदारकी रद्द करावी विखेंची याचिका, औरंगाबाद खंडपीठाकडून खा. नीलेश लंकेंना नोटीस !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

त्यावरील सुनावणीवेळी न्या. किशोर संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अॅड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही.

त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे-पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत.

तसेच नीलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्यांचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी, लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे, आदी मुद्द्यांवर सुजय विखे-पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर वरीलप्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office