अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांसमोर या चोरट्यांनी मोठे आव्हानच उभे केल्याचे चित्र दिसत आहे.दिसभरातून जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या भागात चोरीची घटना घडतेच परंतु पोलिस यंत्रणेच्या हातात हे चोरटे सापडत नाहीत.
पारनेर तालुक्यातील एका विटभट्टी चालकाचे रविवार दि.१७ रोजी बंद असलेले घर फोडून तब्बल पावणेतिन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर पुणे हायवेवरील हॉटेल मातोश्री शेजारी बेलवंडी फाटा येथे असलेल्या वाळुंज यांच्या विटभट्टीवरील बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटून घरात प्रवेश केला.
नंतर घरातील सामानाची उचकापाचक करून तब्बल पावणेतिन लाखांचा ऐवज लंपास केला. यात रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत विटभट्टी चालक गंगाधर रामभाऊ वाळुंज यांनी सुपा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोसई कोसे हे करत आहेत.