पाथर्डी शेवगाव पाथर्डी मतदार संघातील बेरोजगारी संपवण्यासाठी या भागात मिनी एमआयडीसी उभारण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत.या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी अॅड. प्रताप काका यांचा विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज मी पवार साहेबांकडून मंजूर करून घेतो. तुम्ही मतदान रुपी शिक्का मारून अॅड. ढाकणे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन खा. निलेश लंके यांनी केले.
अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुढाकारातून शहरातील एम एम नि-हाळी विद्यालय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. लंके बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, दादा महाराज नगरकर, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, उपाध्यक्ष माधव काटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाट, सिताराम बोरुडे, रफिक शेख, योगेश रासणे, कृष्णा आंधळे, चंद्रकांत भापकर, रामराव चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले की, एमआयडीसीत कामगार म्हणून मी काम केले आहे. यामुळे मला औद्योगिक वसाहत व नोकरीतील समस्या व महत्त्व चांगले माहित आहे. यासाठी दिल्ली दरबारी विविध अधिकाऱ्यांशी मी प्राथमिक स्तरावर बोलणे सुरू केले आहे. या परिसरात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे व दुष्काळी भागात समृद्धी निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत.
या कामासाठी मला खंबीर साथ मिळावी यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून अॅड. ढाकणे यांना आपण उमेदवारी मिळवून देऊ. तुम्ही फक्त भरघोस मतांनी अॅड. ढाकणे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन लंके यांनी केले. या विषयी मेळाव्याचे मुख्य आयोजक अॅड. ढाकणे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून मी सर्वसामान्य साठी संघर्ष करीत आहे.
कुठलीही सत्ता माझ्या हाती नसताना अनेक छोटे मोठे प्रश्न जनआंदोलनाच्या माध्यमातून सोडवले आहेत. आज देखील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. लवकरच जिल्ह्यातील पहिले बेरोजगारांसाठी मार्गदर्शन कार्यालय सुरू करणार आहोत.
याचा लाभ मतदार संघ व परिसरातील इच्छुकांना नियमित घेता येईल. दरम्यान आज विविध कंपन्यांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. निवड झालेले सर्वच आयोजकांचे आभार मानताना दिसत होते.
या मेळाव्यासाठी राज्यभरातील सुमारे ९० कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. तर पाथर्डी – शेवगाव तालुक्यासह लगताच्या परिसरातून तब्बल ३ हजार युवक युवतींनी हजेरी लावली.
या सर्वांच्या मुलाखती घेऊन व कागदपत्रांची तपासणी करून यामध्ये पात्र ठरलेल्या ६३० उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीपत्र लगेचच देण्यात आले. तर उर्वरित उमेदवारांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले असून टप्या टप्प्याने त्यांनाही विविध कंपन्यांमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल असे या मेळाव्याचे समन्वयक किरण राहणे व दिपक पवार यांनी सांगितले.