अहमदनगर बातम्या

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी निवडणुक गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सभापतिपदावर ओबीसी महिला आरक्षण असल्यामुळे या प्रवर्गातील डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे या एकमेव सदस्य असल्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

सन 2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले. तर विरोधी मुरकुटे-विखे गटाचे दीपक पटारे, बाळासाहेब तोरणे, वैशाली मोरे व कल्याणी कानडे हे चार सदस्य विजयी झाले.

दरम्यान सभापती निवडीच्यावेळी ओबीसी महिला आरक्षण असल्याने डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली. काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापतीपद मिळवले.

दरम्यान शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका डॉ.वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे दाखल केली होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांना आपात्र घोषित केले आहे.

पंचायत समितीत विखे-मुरकुटे गटाचे सदस्य संख्या जास्त असले तरी सभापतीपद हे ओबीसी महिलेकरिता आरक्षीत असल्यामुळे डॉ. वंदना मुरकुटे या एकमेव ओबीसी महिला सदस्य असल्यामुळे जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24