Ahmednagar News : यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी वरूणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र झाले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा ९ प्रकल्पांमध्ये २ जुलैअखेर केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेचा पाणीसाठा ३५ टक्के इतका होता. यंदा कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगात झाले असून १७ टक्के साठा मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाला आहे.
मागील वर्षाच्या पावसाळ्यात या वेळी बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाला. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
जूनमध्ये झालेल्या अगदी तुरळक पावसाने धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणाचा साठा २२.९० टक्के आहे.
तर भंडारदरात १६.२५ टक्के जलसाठा आहे. निळवंडेमध्ये अवघा ८ टक्के जलसाठा असल्याने उत्तर व दक्षिण नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता मोजकाच जलसाठा राहिला आहे. त्यामुळे आता मोठ्या पावसाची धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी आवश्यकता आहे.
जिल्ह्यात मोठी व मध्यम प्रकल्पामध्ये एकूण जलसाठा ५१ हजार ९३ दलघफु असतो. मात्र आजच्या तारखेला केवळ ९ हजार ४२० दलघफु जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला १७ हजार ८१७ दलघफु पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा खूप कमी झाला आहे. आढळामध्ये ३८.९६, मांडओहभ ७.५१, पारगाव घाटशिळ हा प्रकल्प कोरडा पडला आहे. सीनामध्ये १२.६७, खैरीमध्ये १२.८२, विसापूरमध्ये २१.१७ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या मुळा व भंडारदरा या दोन धरणांवर संपूर्ण नगर जिल्हा अवलंबून आहेत.
जून महिन्यात धरणांच्या पाणलोटात मोठा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक झाली नाही. परिणामी धरणांमधील पाणी साठा कमालीने घट आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पाणी संकट आता गडद होत आहे.
भंडारदरा धरण १५ ऑगस्टपर्यंत भरते. मात्र जून महिला लोटला तरी मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा हे धरण १५ ऑगस्टपर्यंत भरणार का असा प्रश्न पडला आहे