पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. ज्यांच्या बियाण्याची उगवण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता खतांची आवश्यकता आहे. खत विक्रेत्यांकडे शेतकरी युरिया खतांच्या गोण्या घेण्याकरिता वारंवार चकरा मारत आहेत.
गोडाऊनमध्ये, दुकानात युरिया असतानासुद्धा खत विक्रेते लिंकिंग अर्थात दुसरे खत घेण्यास अप्रत्यक्षरीत्या भाग पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांना हवे ते देण्याऐवजी दुसरेच खत माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप शेतकरी करताहेत.
युरिया घेण्यासाठी खत विक्रेत्यांना वारंवार शेतकरी विनंती करतात; परंतु युरियासोबत इतर कंपनीच्या खतांच्या गोण्या घेण्याकरिता अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्याला प्रवृत्त केले जात असल्याचे बोलले जात आहे.
अगोदरच या हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीची मशागत पेरणी बियाणे, औषधे यासाठी पदरमोड व कर्जबाजारी होऊन शेतकऱ्याने हंगामातील पिके घेण्याचा डाव खेळला आहे; मात्र त्याला निसर्ग पाहिजे अशी साथ देत नाही.
पेरणीपूर्वी झालेला पाऊस वगळता आवश्यक तेवढा पाऊस राहता या भागात झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे अशा परिस्थितीत बळीराजाला धीर व आधार देण्याऐवजी कृषी केंद्र चालक अर्थात खत विक्रेते शेतकऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या छळत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
अनेक कृषी बियाणे व खते विक्री केंद्र चालकांकडे युरियाचा साठा असतानासुद्धा शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करतात या मागचे गुपित काय? असा सवाल शेतकरी बांधवांमध्ये उपस्थित होत आहे. यांना कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजाराने युरिया विकायची तर नाही ना? असा प्रश्नही दबक्या आवाजात चर्चिला जात आहे.
तालुक्यात सोयाबीन, मका, कपाशी यासह इतर पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. एकीकडे शासन व मंत्री महोदय यांनी आदेशित केले आहे, की शेतकऱ्यांची अडवणूक करू नका तसेच खतांचा काळाबाजार न करता शेतकऱ्यांना खत वेळेवर द्या.
मात्र कृषी केंद्र चालकांकडून अर्थात खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना युरियासारखी खते मिळत नाही. ही तालुक्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब ठरली आहे. याप्रश्नी तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी पावले उचलणार की नाही, तसेच या सदर्भात कोणते धोरण आहे, ते जाहीर करणार की नाही? असाही प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.
एकीकडे निसर्ग परीक्षा पाहतो तर दुसरीकडे युरियासारखी खते घेण्यासाठी खते विक्रेत्यांच्या हाता पाया पडावे लागण्याची शिक्षा यापेक्षा दुर्दैव काय असावे? असाच प्रश्न हताश झालेल्या शेतकऱ्यांना पडला तर नवल वाटायला नको. राहाता तालुक्यातील या परिस्थितीला बदलण्यासाठी तातडीने प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
अन्यथा युरियाचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांना युरिया घ्यायची असेल त्यांना युरियासोबत इतर खते अथवा साहित्य घेण्याची सक्ती करू नये, याकरिता कृषी विभागाने व प्रशासनाने सर्व कृषी केंद्र चालक व खते विक्रेत्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी या निमित्ताने शेतकरी वर्गातून पुढे आली आहे.
यूरिया मिळत नसल्याची बोंबाबोंब सर्वत्र ऐकायला मिळत असतानाही कृषी विभागाचे कानावर काहीच बोंब गेली कशी नाही, याबाबत कृषी विभागाची हाताची घडी व तोंडावर बोट, अशी तर भूमिका नाही ना किंवा सर्व काही माहिती असूनही कृषी विभाग झोपेचे सोंग घेतो की काय? असा सवाल अनेकांना पडल्याशिवाय राहात नाही.
काही खते विक्री दुकानांमध्ये चार- पाच दिवसांपूर्वीच युरिया उपलब्ध झालेला आहे; परंतु ती शेतकऱ्यांना दिला जात नाही, याबाबत शेतकऱ्यांनी दुकानदारास विचारल्यानंतर युरिया आहे; परंतु अजून वरून ग्रीन सिग्नल आला नाही, असे उत्तर दिले जात आहे. नेमका ग्रीन सिग्नल कोणाचा हवा व त्या मागचे गणित काय? जेव्हा आवश्यकता आहे त्यावेळेस जर युरिया मिळाली नाही, तर नंतर युरिया टाकून काय फायदा? असा संतप्त सवालही काही शेतकरी करत आहेत.