Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ दैनंदिन पुजा करणाऱ्या पुजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काल मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी हजारो वारकऱ्यांसह गुहा व पंचक्रोशीतील कानिफनाथ फक्त या मोर्चात सहभागी झाले होते.
टाळ, मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथभक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले. त्यानंतर अतिशय शिस्तबद्धरित्या निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठेमार्गे राहुरी तहसीलवर धडकला.
यावेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला. मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव, संजय महाराज शेटे,
भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे, आदींसह राज्यातील संत महंत व टाकळरी, वारकरी व नाथ भक्त सहभागी झाले होते.
यावेळी उद्धव महाराज मंडलीक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव, प्रा. एफ. झेड देशमुख, धोंडाबाई गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले.
वारकरी व नाथभक्त यांच्या मोर्चास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.
वारकरी, नाथभक्त व गुहा ग्रामस्थ यांनी वारकऱ्यांवर व पूजाऱ्यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनाने स्वीकारले.