अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी तालुक्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांसाठी भरपाई म्हणून पंचवीस कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी केवळ सात कोटी रुपये मिळाले आहेत.
अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचे अठरा कोटींचे नुकसानीचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. श्रेय कोणीही घ्या. मात्र, हे पैसे तातडीने देण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पाथर्डी तालुक्यात दोन टप्प्यांत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही. पहिल्या टप्प्यात तालुक्यात २६००० शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे सोळा कोटी रुपयांचे नुकसान झाले. सोळा कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू आशा वल्गना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्या.
त्यात सात कोटी अनुदान मिळाताच श्रेयवादावरून राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकत्यांत एकच चढाओढ सुरू झाली. जे अनुदान मिळाले ते चांगलेच झाले.
मात्र, आता पहिल्या टप्प्यातील चौदा हजार शेतकऱ्यांचे नऊ कोटी रुपये व दुसऱ्या टप्प्यात झालेल्या नुकसानीचे चौदा हजार शेतकऱ्यांचे नऊ कोटी, असे अठरा कोटी रुपये सरकार शेतकऱ्यांना कधी देणार आहे.
शेतकरी अडचणीत असताना नुकसानीचे पैसे का मिळत नाही. आठ दिवसांत हे नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत अन्यथा पाथर्डीच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.