अहमदनगर बातम्या

जिल्ह्यात वीजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह अतिवृष्टीचा इशारा !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- भारतीय हवामान विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात आज आणि उद्या या दोन दिवसांच्या कालावधीत वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीसह वीजा पडण्याची शक्यता वर्तवीलेली आहे.

यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सदयस्थितीत 4,255 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.घोड धरणातून घोड नदीपात्रात 5,400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तर सिना धरणातून सिना नदीपात्रात 6,22 क्युसेस व खैरी धरणातून 4,68 क्युसेस विसर्ग सुरू आहे. नगर जिल्ह्यातील पर्जन्यमानामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदी पात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपल्या जवळच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office