भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी (दि. १६) विजांच्या कडकडाटासह वादळवारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
तसेच अहमदनगरसह, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यात आगामी तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. वादळी वाऱ्यापासून सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले.
जिल्ह्यात मे अखेरीस तापमानात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस तापमानात वाढ झाली होती.
त्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. काही तालुक्यात अवकाळीच्या हलक्या सरी बरसल्या. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली.
ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अर्लट वर्तविला आहे. जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा
बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळवारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करावा.