Ahmednagar News : कोळवडी गावातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्यामुळे आज ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा विचार केला होता; परंतू भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर यांच्या मध्यस्थीने यावर तोडगा निघाला. मात्र ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या.
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या कुकडी कालव्यातील पाण्याने कोळवडी परिसरातील भूमिगत बंधारे भरून मिळावेत, मायनर ७८ चारी व चीलवडी चारीला पाणी सोडण्यात यावे, सध्या करमाळ्याकडे पाणी सोडलेले असून, तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते तर काही भाग मात्र कोरडा ठेवला जात असल्याच्या संतप्त भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
पाण्यातसुद्धा राजकारण केले जात असून, कोळवडी गावात कुकडीचे कार्यालय आहे, गावाला कॅनलचा वेढा आहे तरीही गावावर पाण्याबाबत सतत अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार होते.
मात्र, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर यांनी मध्यस्थी करून कुकडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी नागरिकांची मागणी मान्य करत लगेच पाणी सोडण्याचे मान्य केले. आज दि. १९ ऑगस्ट रोजी पाणी न सोडल्यास उद्या कुकडीच्या पाण्यात महिलांसह ग्रामस्थ उतरून जलसमाधी घेत आंदोलन करण्याचा इशारा कोळवडी ग्रामस्थांनी दिला आहे.
पाण्याविना आमचे हाल होत असून, पिके जळू लागली आहेत. पावसाळ्यात अशी अवस्था असेल तर उन्ह्याळ्यात आम्हाला कोण वाली आहे, असे म्हणत प्रशासनाने सर्वांना न्याय देण्याची गरज असताना कोळवडी येथील कुकडी कार्यालयातील कर्मचारी आम्हालाच दमबाजी करत असून आमच्यावर अन्याय करत आहेत, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.