अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगण सिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत लाभेश औटी व जयसिंग मापारी यांच्या ग्रामविकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत ९ -० ने विजय मिळवला.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर मतदार संघात ग्रामपंचात बिनविरोध करण्याची भुमिका जाहिर केली होती. त्याला प्रतिसाद देत सत्ताधारी लाभेश औटी व विरोधक माजी सरपंच जयसिंग मापारी यांचे दोन गट प्रथमच बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्र आले होते.
जिल्ह्यात सर्वात प्रथम राळेगण सिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले होते. हजारे यांनीही यांनी निर्णयाचे स्वागत केले होते.
परंतु, अपक्षांच्या गटाने उमेदवारी कायम ठेवल्याने ७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली तर स्नेहल फटांगडे व अनिल मापारी हे बिनविरोध झाले होते.
मतदानाच्या एक दिवस भरारी पथकाच्या छाप्यात एका अपक्ष उमेदवारांनी साड्या वाटप केल्याबद्दल चार जणांविरोधात आचार संहितेचा गुन्हा दाखल होऊन गालबोल लागले होते. तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती.