Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबर आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशात आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे काम शनिवार (दि.१६) पासूनच सुरु झाले आहे.
सिव्हीजील अॅपवर तक्रार प्राप्त होताच अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संचालनात घटनास्थळी भरारी पथके पोहचून तक्रारीचे निवारण होत आहे. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार सतर्क झाले असून दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण ७२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
लोकसभा सार्वत्रीक निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यापासून जिल्हा नियंत्रण कक्षआचारसंहिता मध्ये सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर जिल्हा अपर जिल्हाधिकारी मापारी यांच्या निगराणीत आचारसंहिता कक्षाचे काम सुरू झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता तक्ररी नोंदवण्यासाठी सीव्हिजिल अॅप तसेच १९५० हा टोल फ्री क्रमांक, ०२४१- २३४१९५५ या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सोबतच ई-मेलवरून तक्रार करण्याची पर्याय देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले फलक, भिंती फलक हटविण्याची जबाबदारी निश्चत करण्यात आली. खासगी मालकीच्या ठिकाणी असलेले फलक हटविण्याची जबाबदारी संबंधित मालमत्ताधारकावर आहे.
नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि सोपवलेली जबाबदारी बिनचुकपणे पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी निवडणूकीशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्गास दिले आहेत.
त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्याचा प्रत्यय बुधवारी आला. सीव्हीजील अॅपवर नागरदेवळे परीसरातील तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आचारसंहीता कक्षातून तात्काळ निर्देश जारी होताच घटनास्थळी भरारी पथक पोहोचले. स्थानीक स्वाराज्य संस्था ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधीत राजकीय पक्षाचा मसूदा हटवला.
तसेच याप्रकरणी दंडही ठोठावला. याचा रिपोर्ट नगर पंचायत समिती बीडीओ, बीडीओ द्वारा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुरी विधान सभा मतदार संघ यांना पाठविण्यात आला. तक्रारीचा निपटारा केल्याची नोंद अवघ्या अडीच तासात झाली.
नागरदेवळे येथे एका घराच्या दर्शनी कंपाउंडच्या भिंतीवर भाजपचे चिन्ह असलेला फलक रंगविण्यात आला होता. याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. नागरदेवळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन तक्रारीची खात्री केली. रंग देऊन संबंधीत मजकूर झाकण्यात आला. या संदर्भात शंभर रूपये दंड करण्यात आला.
दरम्यान आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक संबंधीत घटकाने घ्यावी. उल्लंघन अढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नियंत्रण कक्षाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिला आहे.