अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या तीन-चार दिवसापासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
यामुळे भंडारा धरणात पाण्याची मोठी अवाक सुरु असून काल पहाटे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. काल सायंकाळी धरणात 10481 दलघफू पाणीसाठा कायम ठेवून येणारे पाणी स्पील वे तून आणि विद्युत गृह क्रमांक 1 मधून असा एकूण 3268 क्युसेकने पाणी भंडारदरातून प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.
यामुळे निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. हे धरण दोन तीन दिवसांत भरण्याची शक्यता आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाणलोटात अतिवृष्टी झाली. परिणामी भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक झाली.
त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात तब्बल 801, निळवंडे 452 आणि मुळा धरणात 916 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 6 वाजता 10481 दलघफू पाणीसाठा झाला होता.
निळवंडेत 6126 दलघफू पाणीसाठा असून हेही धरण 75 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. तर मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक होत असल्याने काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 17736 दलघफू झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता शक्यता आहे.
आढळा धरणातही पाणी येत असून 68 टक्के साठा आहे. भोजापूर धरण भरल्याने म्हाळुंगी नदी प्रथमच वाहती झाली आहे. मुळा पाणलोटातही धुव्वाधार पाऊस सुरू आहे.काल सायंकाळी 7 वाजता हे धरण 70 टक्के भरले होते. पाऊस सुरू असून येणारी आवक पाहता हे धरण आज 75 टक्के होण्याची शक्यता आहे.
पाणलोटात पावसाचा जोर सुरू असल्याने मुळा नदीवरील 202 दलघफू क्षमतेचे बलठण तलाव ओसंडून वाहत आहे. पाडोशी आणि सांगवी ही छोटी धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत. दुष्काळी भागाला वरदान ठरणार्या भोजापूर धरणही भरले आहे.
दरम्यान, भंडारदरा धरणाचे कार्यकारी अभियंता नान्नोर,सहाय्यक कार्यकारी अभियंता देशमुख, रावसाहेब शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली धरण पाणी पातळी नियोजन पथकाचे सर्वश्री बिनतारी यंत्रचालक प्रकाश दादा चव्हाण, गेजवाहक मंगळीराम मधे, मुकादम वसंत भालेराव, शिपाई सुरेश हंबीर, वायरमन अर्जून धनगर, व्हॉल्वद्वारचालक तुकाराम घोरपडे,
जनरटर ऑपरेटर दत्तात्रय पाबळकर, गणपत मोरे हे पाणी पातळीवर लक्ष ठेऊन आहेत. कुकडी, डिंभे धरण 70 टक्के दक्षिण नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या कुकुडी धरण समुहातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पात 46 टक्के पाणीसाठा झाला असून एकूण 14000 दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल सकाळी 8540 दलघफू (70 टक्के) नोंदवला गेला. सुमारे बाराशे दलघफू क्षमतेच्या वडज धरणातील पाणीसाठा 1000 दलघफू (85टक्के)पाणीसाठा होता. पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.
माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणातही आवक होत आहे. पिंपळगाव जोगे धरणात मृत पाणीसाठा होता तो आता उपयुक्त साठ्यात आला आहे. 250 दलघफू पाणीसाठा या धरणात असून माणिकडोडमध्ये 2776 दलघफू (28 टक्के) पाणी आहे. घोड धरणातील पाणीही वाढत असून
3771 दलघफू (63 टक्के) पाणीसाठा झाला आहे. कुकुडी प्रकल्प जुन्नर, शिरूर, पारनेर, नगर, श्रीगोंदा आदी तालुक्यांना वरदान ठरलेला आहे. जिह्यातील पाणलोट क्षेत्रात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. यामुळे या भागातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved