Ahmednagar News : शहरात काही भागात टँकरने पाणी तर काही भागात नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावरून पूर सदृश वाहणारे पाणी, आशा पार्श्वभूमीवर धामणगाव रस्त्यावरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून फुटली असून
त्या विभागात पाणीपुरवठा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पालिका प्रशासन अथवा पाणीपुरवठा विभागाचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर, फुलेनगर, आसरा नगर, भगवान नगर अशा भागात पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यातच रस्त्याची व इमारतींची कामे सुरू असल्याने खोदकामादरम्यान काही नुकसान झाल्यास त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने बघत नाही.
शहराला पाच तेआठ दिवसातून एक वेळा नळा वाटे सुमारे ५० मिनिटे पाणीपुरवठा होतो. जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने घट होत असून पाणी उपसा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच शहरासह ४५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीच्या अमरापूर साठवण टाकी वरुन टंचाई विभागाचे टँकर भरले जातात.
त्यामुळे पुरेसे पाणी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठावर होत आहे. शहरात हंडाळवाडी सारख्या उपनगरांमध्ये टँकरने पाणी चालू आहे. मेन रोड विभागात विशेषतः अष्टवाडा, आखर भाग, रामगिरी बाबा टेकडी परिसर अशा भागात पाणी सुटल्यास मुख्य रस्त्यावरून ओढ्या सदृश पाणी वाहते.
पाण्याचा अपव्यय पाहून नागरिकांना खूप तळतळ वाटते. गेल्या पंधरा दिवसांपासून धामणगाव रस्त्यावरील गाव तलावा जवळील नवीन बांधकाम सुरू असलेल्या कंपाउंड वॉलच्या बाहेरील बाजूस पाईपलाईन फुटली आहे.
ऊपवाहिनी असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय पाणी सुटल्यावर होतो. मात्र सकाळी व सायंकाळी फिरायला येणारे नागरिक पाण्याची नासाडी बघून पालिकेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त करीत आहेत.
संबंधित पाईपलाईन ची दुरुस्ती त्वरित करून पाण्याचा अपव्य थांबवावा अशी नागरिकांची मागणी आहे.