Ahmednagar News : तालुक्यातील पानवठे मार्चमध्येच कोरडेठाक पडले होते. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली होती. वनविभाग तसेच लोक सहभागातून पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
नगर तालुक्यात असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये हरिण, काळवीट, ससा, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, साळींदर, रानमांजर, रानडुक्कर, बिबट, मोर तसेच विविध जातीच्या पक्षांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो.
सद्यस्थितीत डोंगर रांगांमधील पाण्याचे झरे आटल्याने वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली होती. वनविभागाचे असलेल्या साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रामध्ये १८ कृत्रिम पाणवठे बनवलेले आहेत तर नैसर्गिक पानवठ्यांची संख्या ही मोठी आहे.
चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने डोंगर रांगांमधील पाणीसाठा संपला आहे. वनविभाग तसेच काही गावांनी लोकसहभागातून पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
बहिरवाडी, ससेवाडी, चापेवाडी, गुंडेगाव, धनगरवाडी, कामरगाव, मांजरसुंबा तसेच इतर पानवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात आल्याने वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
तालुक्यात असणाऱ्या छोट्या मोठ्या तलावांमधील पाण्याचा उपयोग वन्य प्राण्यांसाठी होत असतो. परंतु चालू वर्षी तलावांनी पाणीच आले नाही. सर्वच तलाव, बंधारे कोरडे ठाक पडलेले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी हाल होत होते.
पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी मानव वस्तीकडे धाव घेतात त्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका असतो. तसेच रस्ते अपघातातही वन्य प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करणे गरजेचे होते.
तालुक्यातील विविध पानवठ्यांमध्ये पाणी सोडण्यात आल्याने नागरीक तसेच वनमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभागाच्या वतीने उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, वनपाल शैलेश बडदे,
वनपाल कृष्ण हिरे, वनपाल अशोक शर्माळे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक रणसिंग, एस. एम. इंगळे, ए.आर. खेडकर, राजश्री राऊत, गोसावी, अजय चेमटे, संजय सरोदे हे वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जेऊर परिसरामध्ये बाळासाहेब पाटोळे, शंकर तवले यांनी पानवठ्यात पाणी टाकण्यासाठी मदत केली केली. कामरगाव मध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पानवठ्यांमध्ये पाणी सोडले आहे.
पानवठ्यांमध्ये उन्हाळा संपेपर्यंत पाणी टाकण्यात सातत्य राखण्याची गरज आहे. यापुढे वाढदिवस तसेच शुभ कार्यप्रसंगी पानवठ्यांमध्ये पाणी टाकून वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्याचे आवाहन वन मित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.