अहमदनगर बातम्या

शेवगावकरांना १०-१५ दिवसांतून एकदा पाणी ! सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष…

Published by
Ahmednagarlive24 Office

शेवगाव शहरातील नळाला १० -१५ दिवसांतून अल्पकाळ पाणी सुटते. या ज्वलंत प्रश्नावर येथे विविध पक्ष व संघटना रोजच अधुनमधून अर्ज, विनंत्या, उपोषणे, आंदोलने करत असतात, पण प्रशासनाला अद्याप जाग येत नाही.

त्यातच शहरासाठी मंजूर केलेल्या ८२ कोटी रु. खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर होऊन सहा महिने झालेत तरीही प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू यांनी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली.

येत्या दहा दिवसांत काम सुरू न झाल्यास उपोषण, आंदोलन तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी लगेच ५ डिसेंबरला सर्व संबंधित एजन्सी व या कार्यकत्यांच्या संयुक्त बैठकीचे आदेश जारी केले आहेत.

शेवगाव नगरपरिषदेने ८२ कोटींच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर देऊन सहा महिने झाले असतानासुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा योजनेचे कन्सल्टंट, योजनेचे ठेकेदार आणि नगरपरिषदचे पाणीपुरवठा अभियंता व या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांनी ५ डिसेंबर रोजी बैठक बोलावली आहे.

या वेळी रखडलेल्या पाणी योजनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून संबंधित पाणी योजनेचे त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्याचे आश्वासनदेखील शिष्टमंडळाला मिळाले.

शिष्टमंडळात प्रेमसुख जाजू, भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे, माजी नगरसेवक अशोक आहूजा, कमलेश गांधी, कैलास तिजोरे, अजय भारस्कर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, अविनाश देशमुख, बाबु सय्यद, राहुल बंब, भूषण देशमुख, केदारनाथ तोतला आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

येत्या दहा दिवसांत तोडगा न निघाल्यास शेवगाव तहसील कार्यालयासमोर शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व नागरिकांच्या वतीने शहर बंद करून आंदोलन उभारण्यात येणार आहे तसेच योजनेचे काम सुरु न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार जाजू यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office