Ahmednagar News : भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी सोडले ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निळवंडे धरणातून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता २ हजार ४०० क्युसेकने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, दुपारी अडीच वाजता भंडारदरा धरणातूनही १ हजार ९१५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. नदीची पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली. यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक वाढू लागली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संपलेल्या ३६ तासांत भंडारदरा धरणात ३३७ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

दि. २४ जुलै रोजी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. यावेळीही जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यानंतर आता १५ ऑगस्टपर्यंत या धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दलघफुपर्यंत ठेवायचा असल्याने आणि नवीन पाण्याची आवक विचारात घेऊन भंडारदरा धरणातून दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

निळवंडे धरणात ३६ तासांत २१४ दलघफु नवीन पाण्याची आवक होत धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ६ हजार ८११ दलघफु झाल्याने या धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी सहा वाजता धरणाच्या लोखंडी वक्र दरवाज्यांतून १ हजार ६०० आणि वीज निर्मितीसाठी ८०० असे एकूण २ हजार ४०० क्युसेकने पाणी प्रवरा नदीच्या पात्रात झेपावले. या मोसमात सुरुवातीलाच निळवंडे धरणातून एवढे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळे आता प्रवरा नदीच्या पाण्यात वाढ होऊ लागली आहे.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा पाणलोट क्षेत्रात घाटघर ७५, रतनवाडी ७९, पांजरे ६७, भंडारदरा ५९ तर वाकी ४६ मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली.