कल्याणरोड परिसरात पैशासाठी पाणी टंचाई : नागरिकांचा आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- गेल्या ३0 वर्षापासून कल्याणरोड परिसरात लोकवस्ती आहे. आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या भागाचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे, नगरसेवकांकडे निवेदने दिली. शिवाय महालिकेसमोर अनेकदा आंदोलने केली.

कल्याण महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोकोही केला. नागरिकांवर गुन्हेही दाखल झाले होते.प्रशासनाला या भागातील नागरिकांच्या अडचणींची जाणीव झाली नाही. अजूनही नागरिकांची तहान भागविली नाही. आजही या परिसरात १0-१२ दिवसांनी पाणी सोडले जाते. तेही कमी दाबाने सोडले जाते.

त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसून कितीही काटकसरीने वापर केला तरी जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस जाते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टॅकर वाल्यांना, पाणी सोडण्याऱ्यांना तसेच नगरसेवकांना पाण्यासाठी वारंवार फोन लावावे लागते. तरीही नागरिकांना पुरेसे पाणी दिले जात नाही.

आजही सणासुदीच्या काळामध्ये कल्याणरोड परिसरामध्ये पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कल्याणरोड परिसरामध्ये पाण्याचे लाईन टाकले असतानाही कमी दाबाने पाणी का दिले जाते. टॅकर सुरु राहण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम पाणी टंचाई केली जात नाही ना?

महापालिका कल्याणरोड परिसरातील टॅकरवर लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी का मिळत नाही. मोफत पाणी असतानाही सर्व टॅकर चालक नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात पैशाची मागणी करत असतात. जो पैसे देईल, त्यालाच आधी पाणी दिले जाते. या भागातील ठराविक लोकांनाच पाणी मिळते.

सर्वसामान्य लोकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. नागरिकांना पाणीपट्टीबरोबरच टॅकरचेही पैसे मोजावे लागतात. तसेच महापालिकेचा टॅकरवरही लाखो रुपये खर्च होतो. या भागातील वॉलमनही जाणीवपूर्वक कमी दाबाने पाणी सोडत असताना एकाचवेळी चार-पाच वॉलमधून पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते.

प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष का करते? असा प्रश्‍न नागरिकांत उपस्थित होतो. फेज टू पाणी योजनेचे काम या भागातील बहुतांश पूर्ण झाले आहे. या योजनेचे काम अपूर्ण असल्याने मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही या पाण्याचा या भागातील नागरिकांना काहीही उपभोग घेता येत नाही.

तरी फेजटू पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पाणीप्रश्‍न दूर करावा, अशी मागणी विद्या कॉलनी, संभाजीनगर, समतानगर, अनुसयानगर, विद्या टॉवर, शिवाजनगर, गणेशनगर आदी भागातून नागरिक करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24