नेवासा तालुक्यातील पाईपलाईन फोडल्याने चार दिवसांपासून पाणीबाणी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीजवळील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यामुळे गावाला चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीपुरवठा होण्यास ग्रामपंचायतकडून विलंब होत आहे. एकाच महिन्यात जवळपास तीन वेळाही पाईपलाईन फोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील शंभर फूट इलेक्ट्रिक केबल कापून चोरून नेली आहे. तसेच गावातील मराठी शाळेतील बोअरवेल मधील विद्युत मोटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

मराठी शाळेसाठी अनेक दानशूर व्यक्ती गरीब विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात. पण त्याच शाळेत मदत करण्याऐवजी चोरी करण्याचा प्रयत्न मात्र जाणीवपूर्वक केला. तसेच गावातील पाण्याच्या टाकी जवळील पाणी सोडण्याचा वॉलचे तोडफोड करून नटबोल्ट फेकून दिले.

तसेच विहिरीजवळील स्टार्टरच्या बॉक्समध्ये वायरच्या साह्याने विद्युत करंट सोडण्याचाही अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक प्रयत्न केला. उन्हाळ्यात पाणपोई उघडून पाणी पाजण्याचे पुण्याचे काम काही नागरिक करतात. परंतु येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याचे पाण्याची पाईपलाईन फोडून मोठ पाप करण्याचे काम अज्ञात व्यक्तीने जाणिवपूर्वक प्रयत्न केला आहे.

याबाबत शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली असून अशा खोडसाळ प्रवृत्तीच्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्या व्यक्तीवर अत्यंत कडक कारवाई करु, असे आश्वासन शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe