अहमदनगर बातम्या

पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाण्याचे स्रोत आटले, चारा छावण्या सुरू करा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पारनेर तालुक्यात आजपर्यंत पुरेसा पाऊस नसल्यामुळे तालुक्यात असलेले पाण्याचे स्रोत आटले असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांकडील पशुधन वाचवण्यासाठी आता चारा छावण्यांची गरज आहे हे ओळखुन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे पारनेर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यासंबंधीची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात झावरे यांनी म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने पारनेर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस नसल्याने तालुक्यातील मांडओहळ धरणात केवळ २ ते ३ टक्के पाणीसाठा राहिला आहे.

पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासकीय यंत्रणा सक्रीय होऊनही पाणी स्त्रोत नसल्यामुळे हतबल झाली आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी व चाऱ्याचा मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पाणी व चाऱ्याअभावी पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे. सन २००२-०३ या काळात मोठा दुष्काळ असताना तत्कालीन सरकारने पशुधन वाचविण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने त्वरित जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी झावरे यांनी निवेदनात केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office