अकोले तालुक्यात दोन गावांसह २० वाड्यावर टँकरने पाणी पुरवठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : धरणाच्या अकोले तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली असून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे.

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मन्याळे, मुधाळणे या २ गावासह २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून तिरडे, जांभळे व समशेरपूरच्या वाड्याचा पाणीटंचाईचा प्रस्ताव नुकतेच दाखल करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यात भंडारदरा हे ब्रिटिशकालीन धरण तसेच अलीकडेच पूर्णत्वास गेलेले निळवंडे धरणाबरोबरच आढळा, पिंपळगावखांड या मोठ्या धरणांसह छोटी १८ घरणे तर छोटी-मोठे अनेक बंधारे अकोले तालुक्यात आहे. सध्या या धरणांनी देखील तळ गाठला आहे.

गत पावसाळ्यात पावसाचे आगार असलेल्या हरिशचंद्रगड व कळसुबाई शिखर परिसरात पावसाने मोठा दगा दिला. मार्चपासून जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात झाली होती. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे तालुक्याला यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार हे आधीच स्पष्ट झाले आहे.

या पृष्ठभूमीवर उपाययोजनाही राबविण्यात येत असल्या तरी वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत पाणीटंचाईच्या झळाही पाणी दार तालुक्याला बसत आहे. तर तालुक्यात २ गावे आणि २० वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अद्याप कडक उन्हाळ्याला महिना बाकी आहे.

प्रशासन नियोजन करीत असले तरी लोकसभा निवडणूकीमुळे पाणीटंचाई समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, मुळा, प्रवरा, आढाळा, कृष्णावंती या नदीकाठावरील गावातील नागरिकांना सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

गेल्या पावसाळ्यात कमी पावसामुळे सगळीकडे पाणीपातळी खोल गेली आहे. एकीकडे भूगर्भात कमी होणारी जलाशयाची पातळी, तर दुसरीकडे लहान-मोठे जलस्रोत असलेले नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

■ अकोले तालुक्यात भंडारदरा, निळवंडे, आढाळा, देवहंडी, बलठण, अंबित, पिंपळगाव खांड, शिळवंडी, सांगवी यासारखी मोठी धरणे, लघुपाटबंधारे असतानाही तालुक्यातील गावपाड्यांना दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. गाव पाड्यासाठी नळपाणी योजना, कूपनलिका, अशा अनेक माध्यमातून पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप बहुतांशी गावातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. प्रत्येकवर्षी तेच गाव, त्याच वाड्या पाणीटंचाईग्रस्त असतात. त्यामुळे या ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी पाणीयोजना देऊन त्यांच्या डोक्यावरील हंडा कधी जाणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

■ यंदा अत्यल्प पावसामुळे आदिवासी भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उष्ण तापमानामुळे तालुक्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पशूसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात चारा टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेपाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज आहे.

■ अकोले तालुक्यातील मन्याळे, मुथाळणे या दोन गावे आणि देवठाण, केळी ओतूर, कळवं, मुथाळण्याच्या २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच तिरडे, जांभळे व समशेरपूर येथील वाड्याची पाणी टंचाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. – विकास चौरे, प्रभारी गटविकास अधिकारी, अकोले