Ahmednagar News : कुकडी डावा कालव्याचे पाणी नदीमार्गे सोडण्यात आले असून, हे पाणी निघोज येथील कुंड बंधाऱ्यात १७ एप्रिलपर्यंत कुंड बंधाऱ्यात पोहचणार असल्याची माहिती निघोज विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सुनील वराळ यांनी दिली.
निघोजला पाणीपुरवठा करणारा कपिलेश्वर बंधारा कुकडी कालव्याच्या पाण्याने भरून घेण्यात आला. तनंतर हे पाणी कुंड बंधाऱ्यापर्यंत जावून तोही भरून घेण्यात येतो; परंतू त्याआधीच कुकडी कालव्याचे पाणी बंद झाल्याने कुंड बंधारा रिकामा राहिला.
श्री मळगंगा देवी व कुंड पर्यटन स्थळावरील यात्रा काही दिवसांवर आली असताना पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्या अनुषंगाने कुकडी नदीच्या पाण्याने कुंड बंधारा भरून घेण्यात येणार असून, त्यासाठी येडगाव धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
हे पाणी दोन दिवसांपूर्वी नदीमार्गे सुटले असून, बुधवार (दि. १७) पर्यंत कुंड बंधाऱ्यात पोहचणार आहे. तेथून पुढे म्हसे गावापर्यंत पाणी सोडण्यात येणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी वापरण्यात येणार असल्याने उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे,
अशी माहिती कुकडीचे उपअभियंता खाडे व शाखा अभियंता पाटील यांनी देतानाच कुकडीचे अधिकारी पाणीप्रश्नासंदर्भात नेहमीच सहकार्य करत असल्याची माहिती चेअरमन सुनील वराळ यांनी दिली.