अहमदनगर बातम्या

‘कुकडी’ तून विसापूर धरणात सोडणार पाणी ! पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या आवर्तनातून विसापूर धरणातून २०० एमसीएफटी पाणी सोडून त्याखालील आठ गावांना आवर्तन सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना दिल्या असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.

१ मार्चपासून सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनातून विसापूर प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे तसेच राज्य फेडरेशन संचालक दत्तात्रय पानसरे यांनी १२ मार्च रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

विसापूर धरण लाभक्षेत्रातील बेलवंडी, घारगाव, लोणी व्यंकनाथ, चिमळा, शिरसगाव बोडखा, पिंपळगाव पिसा, पिसोरे बु., हंगेवाडी, या आठ गावांतील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो.

या गावांमध्ये फळबागा, ऊस व इतर चारा पिके मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते व फळबागा आणि चारापिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असते, त्यामुळे पाणी सोडण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करत

अजित पवार यांनी कुकडीच्या आवर्तनामतून २०० एमसीएफटी पाणी विसापूर धरणात सोडण्याच्या सूचना कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना दिल्या आहेत, याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office