आगामी काळामध्ये नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर वरूनच जावी यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजीत देशमुख, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, आर.बी. राहणे, विजय राहणे, सरपंच भाऊराव रहाणे, रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, आनंदराव कढणे, अजय फटांगरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार वाकचौरे पुढे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आ. थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आहे. आगामी काळामध्ये नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर वरूनच जाण्याकरीता आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
आमदार थोरात म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था गुलाम बनवल्या. त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे.
मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. जातिभेद आणि घमेंड असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले आहे.
याप्रसंगी डॉ. सुधीर तांबे, मिलिंद कानवडे, जयश्री थोरात यांची भाषणे झाली. सरपंच भाऊराव राहणे यांनी प्रास्ताविक केले. नंदकिशोर राहणे यांनी सूत्रसंचालन केले. तर एस.एम. राहणे यांनी आभार मानले.