राहुरी शहर : डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला रविवार, २६ एप्रिल २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशात लॉकडाऊन असल्याने हा विवाह सोहळा लॉकडाऊन संपल्या नंतर घेतला जाणार असल्याचे नगर विकास ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
ना.तनपुरे म्हणाले की,२६ एप्रिल २०१९ रोजी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक गरीब नववधूवर दाम्पत्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यास प्रचंड उत्साहात प्रतिसाद लाभला.
त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार होतो. परंतू कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला हा सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रम पार पाडता आला नाही.
ठिकठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचे फलक लावून माहिती देण्यात आलेली होती. इच्छुक नव वरवधूंची कायदेशीररित्या लागणारी कागदपत्रे संबंधितांनी दिलेली होती.
तरी लॉकडाऊन संपल्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा पार पाडणार असल्याचे मंत्री ना. तनपुरे यांनी सांगितले.