२ जानेवारी २०२५ सुपा : हिंदू धर्मात विवाह हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो.लग्न विधीवत व मुहुर्तावर व्हावा, यासाठी लोक प्रयत्नशील असतात. विवाह समारंभास नातेवाईकांनी हजेरी लावावी म्हणून त्यांना लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते. परंतु काळाचा महिमा अगाध आहे. त्याच्या पोटात जे गडप होते ते पुन्हा कधी बाहेर येतच नाही. मग त्या प्रथा, परंपरा असोत की अन्य काही.
विविह समारंभाच्या लग्नपत्रिकांची छपाई व वितरण हा विवाह सोहळ्याचा अविभाज्य घटक, नातेवाईकांची यादी तयार केल्यानंतर मिळेल त्या साधनाने लग्नपत्रिका गावोगावी पोहचविणे जिकिरीचे काम होते. त्यात वेळही फार जायचा. पण आता सोशल मिडियाचा जमाना आला. अवघ्या काही मिनिटांमध्ये शेकडो
नातेवाईकांपर्यंत पोहचता येते.
परंतु यामध्ये वेळ व खर्चाची बचत होत असली तरी लग्नपत्रिका वाटपाच्या निमित्ताने नातेवाईकांच्या घरी जाऊन ख्यालीखुशाली जाणण्याचे, मुक्काम करण्याचे दिवस संपले आहेत. आजच्या डिजिटल युगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडत आहेत. सोशल मीडियावरील विविध अॅपच्या माध्यमातून दूर असलेले आप्तेष्ट, मित्रपरवार यांना लगेच छापील पत्रिका पाठवून निमंत्रण दिले जाते.
पूर्वी लग्न जुळल्यानंतर गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत असे. मात्र, आता व्हॉट्स अॅपवर पत्रिका पाठवून आमंत्रण दिले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर यंदा लग्नाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही ऑनलाईन माध्यमाचा वापर आमंत्रण देण्यासाठी केला जात आहे.
दूर अंतरावरील नातेवाईकांना मित्रमंडळींना प्रत्यक्ष घरी जाऊन लग्नपत्रिका देणे अनेकांना अशक्य असल्याने आमंत्रण व कार्यक्रमाची पत्रिका मोबाईलवर व संदेशावरूनच पाठवली जात आहे.ऑनलाईन जमान्यात याचा वापर वाढला आहे.यापूर्वी दुचाकी व सायकलवरून प्रत्येकाला पत्रिका दिली जात होती.
मात्र, सध्या फोन व सोशल माध्यमावरून पत्रिका पोहचवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.व्हॉट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मोबाईल फोन आदींच्या माध्यमातून सद्य स्थितीत आमंत्रण दिले जात आहे.
दूर अंतरावरील नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे प्रत्येकाला वाटते, पण आमंत्रण देण्याची अडचण असते. मात्र, मोबाईलवरून सर्वांपर्यंत निरोप पोहचविण्याचे काम वेगाने होत आहे. यासह अन्य कार्यक्रमांची वैशिष्टयपूर्ण पत्रिका छापण्याची क्रेझ आजही दिसून येते. सध्या सर्व लोक सोशल मिडियाचा वापर करत असल्यामुळे गेल्या काही वर्षात विवाह समारंभाचे आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी घरोघरी जाऊन पत्रिका देण्याची प्रथा इतिहास जमा होत आहे.