अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- कोळसा खाणींमध्ये कामगारांचे आंदोलन सुरू असल्याने तिकडून कोळशाचा पुरवठा कमी होत होता. त्यामुळे आपल्याकडील कोळसा्र साठा कमी झाला होता.
मात्र आता परिस्थिती सुधारली आहे. वेळ आल्यास काही काळ कृषिपंपांवर भारनियमन होईल, पण घरगुती ग्राहकांचे भारनियमन करावे लागणार नाही,
अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मंत्री तनपुरे यांनी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकार महावितरणचे खासगीकरण करण्याचे धोरण तयार करीत असल्याची चर्चा आहे,
महावितरणचे खासगीकरण झाले तर शेतकरी व अन्य ग्राहकांचे हाल होतील. भारनियमन टाळण्यासाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत विजेचा काटकसरीने वापर करावा.
या काळात विजेची मोठी मागणी असते. या काळात विजेचा दर चार ते पाच पटीने अधिक म्हणजे १२ ते १७ रुपये प्रति युनिटने वीज घ्यावी लागते. राज्याने कोळशाची मागणी केली नाही हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चुकीचे वक्तव्य आहे. त्यांनी अभ्यास करून बोलावे.
ऑगस्ट महिन्यात आमचा अंदाज चुकला होता. त्यावेळी पाऊस कमी झाला, त्यामुळे शेती अन्य क्षेत्रात विजेचा वापर वाढला. त्याचा अंदाज न आल्याने जास्त कोळसा वापरला गेला, असे ते म्हणाले.