अहमदनगर बातम्या

घाटमाथ्याचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर- नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होत आहे. हा संघर्ष कायमचा मिटवण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास या सर्व भागाच्या दुष्काळावर कायमची मात करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ना. फडणवीस कोपरगाव येथे तहसील कार्यालय मैदानात आयोजित महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय संकल्प जाहीर सभेत बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड, बांधकाम मंत्री दादा भुसे, विधानपरीषदेच्या उपसभापती नीलम गोहे,

आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, आमदार संजय शिरसाठ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, रवींद्र बोरावके यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

ना. फडणवीस म्हणाले, गेल्या काही काळात मोठा निधी कोपरगावसाठी देण्यात आला आहे. तोट्यात जाणारी साखर कारखानदारी व ऊस उत्पादक यांना जगविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शेतकऱ्यांचे १० लाख कोटी रूपयांचे उत्पन्न कर माफ केले. त्यामुळे पुन्हा एकदा खा. लोखंडे यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हे म्हणाल्या, की स्व. शंकरराव कोल्हे यांची देश हितासाठी आणि समाज विकासासाठी एकत्र यायचे ही शिकवण आहे. खा. लोखंडे यांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आ. काळे यांनीदेखील देशहितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजे. सिंचनाचे प्रश्न महायुतीचेच सरकार सोडूवू शकते, असे सांगितले.

ना. फडणवीस यांची कोल्हेंच्या निवासस्थानी भेट

कोपरगाव येथे ना. फडणवीस आले असता, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या येसगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला, तर रेणूकाताई कोल्हे व श्रद्धाताई कोल्हे यांनी औक्षण केले. या प्रसंगी नितीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, इशान कोल्हे व कोल्हे परिवार उपस्थित होता.

Ahmednagarlive24 Office