अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कोरोना काळात पारनेर तालुक्यात शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू करून अवघ्या राज्यातच नव्हे तर जगात चर्चेत आलेले आमदार लंके यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे होणार आहे.
लोकांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके (यांच्यावर चित्रपट तयार करण्यात येणार आहे. तसेच या चित्रपटाची घोषणा रविवारी ( ता. 24 ) दुपारी 2 वाजता पिंपळनेर येथे होणार आहे.
दरम्यान पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याश्या गावात शिक्षकाच्या घरात जन्मलेले आमदार निलेश लंके यांचा राजकीय प्रवास शिवसेनेत कार्यकर्ता ते तालुका प्रमुख असा झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांनी आमदारकी मिळवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केला आहे.
आता त्यांचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आमदार निलेश लंके यांच्या निकटवर्तीय असलेले लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांनी आमदार लंके यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
इरोळे यांनी निलेश लंके यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर 2 वर्ष अभ्यास करून कथा पूर्ण केली आणि चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार भूमिका करणार असून चित्रपटाचे गाणे रेकॉर्डिंग देखील जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणून लवकरच आमदार लंके तुम्हाला मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे.