Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना दिवसनेदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे काल (दि. २ ऑगस्ट) दुपारच्या दरम्यान कपाशीच्या शेतात चॉद पठाण या ४५ वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. नाजूक कारणावरुन चाँद पठाण यांची हत्या झाल्याची चर्चा रेल्वे स्टेशन परिसरात सुरु आहे. चांद आंबीर पठाण हे नीलेश तनपूरे यांच्या विटभट्टीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते.

तसेच ते राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात कुटुंबासह राहत होते. २ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या शेजारी राहत असलेल्या काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला होता.
त्यानंतर दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एका पुरुषाने चाँद पठाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला सांगीतले कि, चाँद पठाण हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहे. तेव्हा मयत पठाण यांचा मुलगा शकिल याने रेल्वे स्टेशन परिसरातील मच्छिंद्र पेरणे यांच्या कपाशीच्या शेतात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी चाँद यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गिते, हवालदार सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, नदीम शेख, संदीप बडे, चालक उत्तरेश्वर मोराळे आदींच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
चाँद पठाण यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोपित केले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, चाँद यांची हत्या झाल्याची चर्चा सुरू होती. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पठाण यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच चॉद पठाण यांची हत्या झाली कि आणखी दुसरे काही झाले, हे उघड होणार आहे.