कोतकरांचा पक्ष नेमका कोणता? गोंधळ कायम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांचा पक्ष कोणता याबाबत अद्यापही उत्तर मिळालेले नाही.

मात्र कोतकर राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ. संग्राम जगताप करतात, तर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात कोतकर भाजपचेच आहेत. राष्ट्रवादीकडून सभापती झाल्यानंतर कोतकर यांनी आजपर्यंत त्यांचा पक्ष कोणता हे सांगितलेले नाही. महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक नुकतीच झाली.

या पदासाठी भाजपकडून कोतकर इच्छूक होते. भाजपनेही त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले होते. असे असतानाही कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अंतिम दिवशी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जावर सूचक, अनुमोदक देखील राष्ट्रवादीचेच होते.

भाजपचे चार सदस्य असतानाही राष्ट्रवादीचे सूचक, अनुमोदक का घेतले असे आता भाजपमध्ये विचारले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनीही कोतकर यांनी पक्ष जाहीर करावा किंवा कारवाईस सामोरे जावे, असे म्हटले आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले.

भाजपने कोतकर यांना नोटीस देऊन तुमचा पक्ष कोणता ते जाहीर करण्याचे सांगितले आहे. तसेच तसा खुलासा पक्षाकडे करण्यास सांगितले आहे. यासाठी तीन दिवसांचा अवधी त्यांना दिला होता. मात्र नोटीस देऊन दहा दिवस उलटले तरीही पक्ष पुढील कारवाई करायला तयार नाही.

त्यामुळे कोतकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत गोंधळ वाढत चालला आहे. भाजप कार्यकारिणीची बैठक घेऊन कोतकर यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले. मात्र कार्यकारिणी कधी होणार, याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24