अहमदनगर मध्ये हे काय झालं ? माणुसकीच्या भावनेतून तरुणीला घरी आणले आणि तिने घरदार लुटले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : एका युवतीला माणुसकीच्या भावनेतून आपल्या घरात आसरा देणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले असून, ज्या युवतीला मदत केली तिनेच घरातील १ लाख २० हजारांची रोकड आणि ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज घेवून पोबारा केल्याची घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे.

याबाबत एमआयडीसीत काम करणाऱ्या एका महिलेच्या फिर्यादीवरून जसलीन हरीसन जोसेप (रा.मुंबई), या तरुणीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची तरुणी ही पारनेर तालूक्यातील एका तरुणासोबत काही दिवसांपूर्वी नगर एमआयडीसी परिसरात आली होती.

ती तरुणी एका कंपनीत कामाला लागली. त्या कंपनी शेजारील कंपनीत फिर्यादी महिला, तिची सून व इतर महिला कामाला होत्या. त्यांची त्या तरुणी सोबत ओळख झाली. एक दिवस त्या तरुणीने आपल्यावर ओढावलेल्या संकटाबाबत फिर्यादी महिलेला माहिती दिली.

त्या महिलेने जसलीन जोसेप या तरुणीला आपल्या घरी नेले. दरम्यानच्या काळात फिर्यादी महिलेच्या मुलाचे लग्न जमले, त्यामुळे खर्चासाठी त्या महिलेने १ लाख २० हजारांची रोकड जमवली तसेच सुमारे ४ तोळे वजनाचे दागिनेही तयार करून कपाटात ठेवले होते.

बुधवारी (दि.९) सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण कामाला गेले. ती महिला व तिची सून कंपनीत निघाल्या, त्यावेळी जसलीन जोसेप त्यांना म्हणाली की, माझ्या पोटात दुखत असल्यामुळे आज मी कामाला न येता घरीच थांबते.

ही संधी साधून जसलीन जोसेप हिने घरात ठेवलेली रोकड व सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. सायंकाळी कामावरून आल्यावर त्या तरुणीने चोरी करून पसार झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. याबाबत महिलेने रात्री तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी जसलीन जोसेप, या तरुणी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.