अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- करोना प्रतिबंधक उपाययोजनेचे निमित्त करुन अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामविकासाला खिळ घालून जमा केलेल्या २७ कोटींचे काय झाले?असा सवाल जिल्हा परिषदेला भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी विचारला आहे.
करोनाच्या ऐन कहरात संपुर्ण जिल्ह्यातील ग्रामविकास ठप्प झाला.त्यातच अहमदनगर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना फतवा काढून १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम साधारण २७ कोटी रुपये जिल्हा परिषदेला वर्ग करण्याचे फर्मान दिले.वास्तविक हा सारा निधी ग्रामविकासाचा असून यातून गावाशिवारात पायाभूत सुविधांची कामे झाली असती.
करोना उपाययोजनांच्या नावाखाली जमा झालेल्या या रकमेतून २ कोटी ५० लाखांच्या अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या खरेदी करुन त्या जिल्ह्यातील नागरिकांना वाटप करण्याची घोषणा झाली.मे-जून पासून जिल्ह्यातील नागरिक या अर्सेनिक अल्बमच्या प्रतिक्षेत आहेत.
पाच महिने उलटूनही अद्याप या औषधांच्या खरेदीची निविदा प्रक्रियाही पार पडली नसल्याने संशयाला वाव मिळतो. २७ कोटींपैकी अडीच कोटींचे अर्सेनिक अल्बम तर नाहीच शिवाय उर्वरीत २४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी कशासाठी वापरणार हे देखील गुलदस्त्यात आहे.
करोनाच्या महामारीत अहमदनगर जिल्हा परिषदेने ग्रामविकास संकटात घातलाच शिवाय लोकहिताच्या नावाखाली जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशीही प्रतारणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मालकीचा हा निधी शिल्लक राहिला असता तर गावातील कामे मार्गी लागली असती.
परंतु जिल्ह्यातील जनतेची करोनाच्या नावाखाली एकप्रकारे फसवणूकच झाली असून, जमा झालेल्या २७ कोटींच्या निधीचे नक्की काय झाले याच्या चौकशीची मागणीही वाकचौरे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved