अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-बारा मृतदेह एकावर एक रचून कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची पाशवी अवहेलना करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी केलेले कृत्य निंदनीय असून नगरकरांची अब्रू घालवणारे आहे.
अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब कडक कारवाई करा अशी मागणी रसिक ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केली आहे. काही महिन्यांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी शहराची प्रतिष्ठा वेशीवर टांगली असून साऱ्या शहराची राज्यात बदनामी झाली आहे.
तरीही अजून कोणतीही कार्यवाही होत नसेल तर यामागे फार मोठे आर्थिक हित दडले असून केंद्र व राज्य शासनाकडून कोविड 19 साठी किती अनुदान महापालिकेस प्राप्त झाले व त्याचा विनियोग कसा झाला, कसा दाखवला याचा तपशील जनतेपुढे मांडा अन्यथा या सगळ्या संतापजनक कारभाराविरुद्ध न्यायालयात जावे लागेल
असा इशारा येलुलकर यांनी दिला आहे. या हिन कृत्याबद्दल बोलताना ते म्हणाले की दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांचे एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेणारे गोविंदा आपण सर्वांनीच पाहिले असतील..पण एकावर एक बारा मृतदेहांची रास करून
ठेवणाऱ्याअहमदनगर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्याअधिकाऱ्यांना मृतांबरोबर कोणता घृण डाव मांडायचा होता??? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही माणसे, पैशाच्या लोभाने बेफाम झालेले हे भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी का होत नाही.. यांना कोणाचा आशीर्वाद आहे..?
यांच्यासाठी ही महामारी दिवाळीच आहे असे म्हणावे लागेल. या सगळ्या चीड आणणाऱ्या कारभाराची मा. जिल्हाधिकारी,मा.आयुक्त यांनी दखल घेऊन ताबडतोब कडक कारवाई करावी असे आवाहन येलुलकर यांनी केले आहे.