अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- मागील दोन वर्षे कोविड संकटाला सामोरे जाताना समाज घटक हतबल झाले; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन सर्वांनाच दिलासा दिला.
त्यांनी उचललेल्या धाडसी पावलामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिरावली. केंद्र सरकार या संकटात प्रत्येक समाज घटकाच्या पाठीशी उभे आहे; मात्र राज्य सरकारची कोणतीही मदत समाजापर्यंत पोहोचू शकली नाही.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत कोणती मदत केली, याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
प्रवरा2बँकेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन देशातील ४२ कोटी लोकांना बँकेशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटचा माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला.अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यवसायीक, दुकानदारांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार विखे पुढे म्हणाले, बॅँकींग क्षेत्रामध्ये पारदर्शी कारभार करणाऱ्यांना नव्या सहकार मंत्रालयाची भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. सहकार चळवळीमुळे सार्वजनिक विकासाला बळकटी मिळाली.
भविष्यात सोसायटीपासून ते बँकींगपर्यंत सर्वच क्षेत्रांना नव्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकार जाहीर करत असलेल्या योजनांची अंमलबजावणी ही बँकेच्या माध्यमातून होत असल्याने देशातील ४२ कोटी लोक बॅँकांशी जोडले गेले असल्याचे ते म्हणाले.