Ahmednagar News : मुलीला नांदविण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला व थेट जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि. ५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून २२ पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर असे की, मोहन भगवान चव्हाण कुटुंबीयांनी (वय ५०, रा. आरोळे वस्ती, जामखेड) यांची मुलगी पूजा हिचा सासवड येथील रमेश साहेबराव शिंदे या तरुणाशी २०१८ मध्ये विवाह केला होता.
दोन वर्षे नांदविल्यानंतर पूजा हिला सासरच्या मंडळींनी २०२० मध्ये माहेरी आणून सोडले होते. त्यामुळे मोहन चव्हाण व कुटुंबीयांनी पूजा हिच्या सासरच्या मंडळींची वारंवार समजूत काढली. परंतु, त्यांनी तिला नांदविण्यास नेले नाही.
याबाबत मोहन चव्हाण यांनी कर्जत येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, त्यानंतर पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी हे प्रकरण जात पंचायतमध्ये बसवून मिटवू, असे सांगितले. त्यानुसार ४ एप्रिल २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील वन विभागाच्या जमिनीवर २२ पंच न्यायनिवाड्यासाठी बसले होते.
यावेळी पंचांनी तुम्ही पोलिसांत तक्रार का दाखल केली, असे म्हणत तीन लाख रुपये दंड भरा अथवा दंड न दिल्यास डवरी गोसावी समाजातून बहिष्कृत करू, असा निर्णय दिला. या घटनेनी संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी मोहन चव्हाण यांनी मला तुमचा निर्णय मान्य नाही, माझ्या मुलीवरच अन्याय झाला आहे. मला जातपंचायतीचा निकाल मान्य नाही, असे सांगितले. त्यानंतर पंचांनी त्यांना वरील निकाल दिला, असे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील करीत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
राजाराम सखाराम शिंदे, बाबूराव राघू शिंदे, शिवाजी भिवाजी शिंदे, हरिश्चंद्र बाबूराव शिंदे (सर्व रा. यवत, ता. दौंड), साहेबराव भिवाजी शिंदे, बाबाजी पिराजी आहेर, लखन साहेबराव शिंदे (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), अनिल भिवाजी सावंत, भिवाजी नाना सावंत, बाबूराव तात्या चव्हाण, शंकर भयरू सावंत, श्यामराव भीमराव चव्हाण (रा.पाटस, ता. दौंड, जि. पुणे), भगवान शंकर शिंदे (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), रूपचंद दतात्रय सावंत, संजय दगडू सावंत (रा. पेडगाव रस्ता, ता. श्रीगोंदा), नाथा नारायण बाबर (रा. हंडीनिमगाव सुरेशनगर, ता. नेवासा), पिराजी राजाराम शिंदे, शिवराम भयरू सावंत, दया दादाराव सावंत (रा. नाथनगर सोनई, ता. नेवासा), चिमाजी गंगाधर शेगर (रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), बाबाजी भगवान शिंदे (रा. चांदा, ता. नेवासा), प्रकाश एकनाथ सावंत (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे), बापू बाबूराव शिंदे (रा. घोडेगाव, ता नेवासा).