Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मारहाणीच्या अनेक घटना ताजा असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. युवकास कारमधून पळवून नेत त्याला जबर मारहाण केली असल्याचे समोर आले आहे.
कसल्यातरी नाजूक कारणावरून चौघांनी युवकाचे कारमधून अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची माहिती समजली आहे. सलमान रफिक पठाण (वय २४ रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) असे त्या युवकाचे नाव आहे.
त्याने याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित जावळे (पूर्ण – नाव माहिती नाही, रा. मार्केटयार्ड, – नगर), लखन उत्तम गायकवाड (रा. लोणी व्यंकनाथ) व दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
१२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सलमान हे मुठ्ठी चौक जामखेड येथे असताना रोहित जावळे व इतरांनी कारमधून येऊन सलमान याच्या दुचाकीला कार आडवी लावली. ‘तू आमच्या मुलीचा नाद सोडून दे, तिच्या नादी लागू नको’ असे म्हणून मारहाण करून जखमी केले.
शिवीगाळ, दमदाटी करून सलमानच्या ताब्यातील दुचाकी, सोन्याची चैन व मोबाईल असा ५२ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला. त्याचे अपहरण करून नंतर त्यास रस्त्यावर सोडून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी सलमान यांच्यावर नगरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांचा वचक हवाच
सध्या जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना पाहता पोलीस प्रशासनाने वेळीच या गुन्हेगारी घटनांवर वचक ठेवायला हवा. दहशत माजविणाऱ्या लोकांचा वेळीच बंदोबस्त केल्यास भीतीचे वातावरण राहणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.