अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सोशल मीडियाचा गैरवापर करुन उद्योजक व समाजातील नामांकित व्यक्तींच्या नावाने ऑनलाईन पैशांची मागणी करणारे प्रकार वाढत आहेत. नुकताच असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.
संगमनेरातील उद्योजक संजय मालपाणी यांच्या फेसबुकवर असलेल्या अकाऊंट शिवाय त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर जसेच्या तसे खाते उघडले असल्याची धक्कादायक घटना संगमनेरात घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरातील उद्योजक संजय मालपाणी यांच्या फेसबुकवर असलेल्या अकाऊंट शिवाय त्यांच्या नावाने गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फेसबूक क्लोन केले.
या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना ऑनलाईन पैशांची मागणी झाल्याने,
त्यांनी याबाबत संजय मालपाणी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे संजय मालपाणी यांनी तातडीने संबंधीत क्लोन अकाऊंटचे स्क्रिन शॉट काढून घेतले.
या बाबत फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तसेच आपल्या अकाउंटचे पासवर्ड बदलले. तसेच आपल्या फेसबुकवर या अकाऊंटवरुन आलेल्या रिक्वेस्ट स्विकारु नयेत, अशा सूचना त्यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराला दिल्या.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यातून असे बनावट अकाउंट उघडले जात असल्याने बॅंकांच्या माध्यमातून वारंवार अकाउंटविषयी सूचना देण्यात येतात.
ग्राहकांच्या अकाउंटवरील पैसे गायब होऊ नये, यासाठी सांगितले जाते. प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियाच्या अकाउंट, बॅंकेच्या अकाउंटवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.