अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे समोर आले होते.
यानंतर बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. यावरून टीकाही झाली होती. या टीकेला उत्तर देताना खासदार सुजय विखे आक्रमक झाले आहेत. करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे.
पण माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ३०० लोकांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.
एकट्या खासदाराला टार्गेट करण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी केला. कर्जत-जामखेडमध्ये तर रोज भूमिपूजन होतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा. केवळ एका खासदाराला टार्गेट करून उपयोग नाही. त्यामुळे माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल झाल्यास, मी या सर्वांवर ही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार, ‘ असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले होते. त्यानंतर बोलत होते. ‘जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांचे फोटो देखील पहावे. ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेताना माझ्यापेक्षा दुप्पट गर्दी करीत आहेत.
परंतु दुर्देवाने सत्तेच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही. मी जनतेच्या कामासाठी फिरतोय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, तर मी पूर्णपणे तयार आहे. मात्र फक्त माझ्या एकट्यावर हा गुन्हा झाला नाही पाहिजे. मी तर के. के. रेंज प्रश्नासाठी बाहेर पडलो आणि हा प्रश्न तीव्र करणार मी नव्हतो.
तर हा प्रश्न तीव्र करणारे पारनेरला ज्यांनी आंदोलन केले ते होते. या आंदोलनानंतर खरतर मला जनतेमध्ये जावे लागले. अन्यथा करोना थांबण्याची वाट मी पाहू शकलो असतो,’ असेही ते म्हणाले. ‘के के रेंज संदर्भात मी, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सुजित झावरे आदींनी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे मत घेतले.
शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यासंदर्भात दोन दिवसात सविस्तर माहिती देणार आहोत. यामध्ये केंद्राची भूमिका, राज्याची भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका यावर सविस्तर खुलासा करणार आहोत,’ असेही खासदार सुजय विखे यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved