अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : खळबळ उडवून देणारे सीए विजय मर्दा कर्ज फसवूणक प्रकरण नेमके आहे तरी काय? काय झाल्या आहेत घडामोडी? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर मध्ये बँकेसंदर्भात विविध प्रकरणे समोर येत आहेत. काल (दि.१४) नगर शहरात आणखी एक खळबळजनक घटना घडली. शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय ५७, रा. रिद्धीसिद्धी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर रस्ता, नगर) याला आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

फॉरेन्सिक ऑडिटमुळे जे काही धागेदोरे मिळाले त्या आधारे कारवाई झाली.डॉ. निलेश शेळके व मर्दा याने एकत्र जमीन खरेदी केली. या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे मशिन कंपनीचा डीलर जगदीश बजाराम कदम (रा. नवी सांगवी, पुणे) यालाही दोन दिवसांपूर्वी अटक केली असून दोघांनाही न्यायालयाने १८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

डॉ. निलेश शेळके याने काही डॉक्टरांना बरोबर घेऊन “एम्स” रुग्णालय सुरू केले होते. त्याच्या यंत्रसामुग्रीसाठी शहर बँकेकडे कर्ज प्रकरण करण्यात आले होते. यामध्ये फसवणूक व अपहार झाल्याचे तीन गुन्हे कोतवाली पोलिसांत दाखल झाले. हे तिन्ही गुन्हे तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

यात डॉ. शेळकेसह चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा, जगदीश कदम, योगेश मालपाणी, मधुकर वाघमारे, कराचीवाला (पूर्ण नाव नाही) यांच्यासह शहर बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी अशा २७ जणांना आरोपी करण्यात आले. काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

बुधवारी मर्दा याला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. निलेश शेळके व मर्दा याने एकत्रित जमीन खरेदी केली आहे. निलेश शेळके व मर्दा यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, असा दावा तपासी अधिकारी सुहास चव्हाण यांनी केला आहे.

फिर्यादीने नेमके काय म्हटले आहे?

फिर्यादी डॉ. सिनारे (रा. राहुरी) व इतर जे साक्षीदार आहेत त्यांना डॉ. शेळके याने विश्वासात घेऊन एम्स नावाचे हॉस्पिटल उभारले. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी व त्यानंतरच्या काळात या घटना झाल्यात.
हॉस्पिटल उभारल्यानंतर शहर सहकारी बँकेचे संचालक मंडळ, बँक अधिकारी व कर्मचारी, सीए विजय मर्दा, वैद्यकीय मशिनरी वितरक यांच्याशी संगनमत करून शेळके याने सिनारे यांना शहर बँकेतून ५.७५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले.

कर्ज मंजूर झाल्यानंतर ते परस्पर वितरकांच्या नावे रक्कम वर्ग केली. त्यानंतर ही कर्ज रक्कम फिर्यादीच्या नावे बनावट बँक खात्यात वितरकांना परत करण्यास सांगितली. नंतर डॉ. शेळके याने त्याच्या व इतर भागीदारांच्या संयुक्त खात्यात ती वळवली व स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज रकमेचा अपहार केला असे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office