अहमदनगर बातम्या

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण किती टक्के भरले ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण काल रविवारी सायंकाळी ६५.०९ टक्के भरले. धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक जोरदार सुरू आहे. धरणात १६ हजार ९२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

जून महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने धरणात पाणीसाठा कमी झाला होता; मात्र जुलै महिना सुरु होताच धरणामध्ये पाण्याची आवक हळूहळू सुरु झाली. आज धरणामध्ये १६ हजार ९२८ दशलक्ष घनफूट पाणी साठा झाल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गात पाऊस नसला तरी समाधानाचे वातावरण आहे.

धरणात सायंकाळी ६ वाजता ६ हजार ९५१ क्यूसेकने आवक सुरु होती. आवक अशीच सुरु राहिली तर यावर्षी मुळा धरण निश्चित भरेल, असा विश्वास मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी व्यक्त केला.

जलसंपदा विभागाकडील प्राप्त माहितीनुसार २०२०- २१ साली धरण परिचलन सूचीनुसार ३१ जुलैपर्यंत धरणात पाणीसाठा ७६.६१ टक्के अर्थात १९ हजार ९२० दशलक्ष घनफूट (पाणी पातळी १८००.६०) होता. धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा अतिरिक्त विसर्ग धरणातून मुळा नदीपात्रात सोडण्याचे निर्देश आहेत.

मागील वर्षीही अशीच स्थिती झाली होती, मात्र धरण परिचलन सूचीच्या निर्देशाप्रमाणे धरणात तेवढा पाणीसाठा न जमा झाल्याने जुलै महिन्यातच मुळा धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडता आले नाही.

यंदादेखील जुलै महिना संपत आल्यावर धरणाचा पाणीसाठा १७ टीएमसीपर्यंतच पोहोचल्याने आता जुलै महिन्यात धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे दिवा स्वप्नच राहिले आहे. आता राहुरीकरांसह नगर जिल्ह्यातील लोकांना १५ ऑगस्टची वाट पहावी लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office