अहमदनगर बातम्या

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला काय बंद राहणार अन काय चालू राहणार ? वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ram Mandir : हिंदू सनातनी धर्माचे आराध्य प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्या येथे तयार केले जात असून या मंदिरात श्रीरामजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तब्बल पाच शतकांच्या म्हणजेच 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अयोध्या येथे भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगातील हिंदू सनातनी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतात या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच दिवाळीसारख सेलिब्रेशन सुरू आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि उद्घाटन सोहळा उद्या अर्थातच 22 जानेवारी 2024 ला आयोजित करण्यात आला आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. दरम्यान उद्या या सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र आयोध्या येथे जगभरातील सात हजार प्रमुख पाहुणे हजेरी लावणार आहेत. उद्योग, क्रीडा, समाजकारण, राजकारण, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने देखील नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून उद्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. देशातील सर्व पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर मधील बँका अर्धा दिवसासाठी बंद राहणार आहेत. याशिवाय काही खाजगी क्षेत्रातील बँका देखील उत्तर प्रदेश राज्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथे शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात धार्मिक उल्हासाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

धार्मिक उत्सवाच्या या कार्यक्रमाचा सोहळा सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर नोकरदार मंडळीला देखील पाहता यावा यासाठी अनेक राज्यांमधील शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय अनेक राज्यांमधील मांस आणि मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. उद्या कसिनो देखील बंद राहणार आहेत.

एवढेच नाही तर देशाच्या राष्ट्रीय राजधानीतल्या एम्सने देखील उद्या अर्धा दिवसासाठी ओपीडी सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले गेले तर त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यायची आहे.

उद्या मध्य प्रदेश मध्ये सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीचे दुकाने बंद राहतील. तसेच एमपी मध्ये सर्व प्रकारची शासकीय कार्यालय दुपारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मध्ये देखील शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. गोव्यात सर्व शासकीय कार्यालय बंद असतील शाळा देखील बंद राहणार आहेत. हरियाणा राज्यात उद्या शाळांना सुट्टी राहणार आहे. ओडीशा राज्यात सुद्धा सरकारने अर्धा दिवसाची सुट्टीची घोषणा केलेली आहे.

गुजरातमध्ये सुद्धा उद्या अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत उद्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा, कॉलेज, मांस आणि मद्य विक्री दुकानें, शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. एवढेच नाही तर काही खाजगी संस्थानांनी देखील आपले कामकाज उद्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने उद्या आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे.

उद्या भारतीय शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. एकंदरीत प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असून आता फक्त आणि फक्त राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे राम भक्तांच्या नजरा लागल्या आहेत. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य बनवण्यासाठी उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले आहेत. यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

Ahmednagarlive24 Office