अहमदनगर बातम्या

चाललंय काय? नगर शहराच्या तीन पाणी योजनांवर २९४ कोटी खर्च ! दररोज ७.५० कोटी लिटर पाण्याची गरज व उपसा होतोय १० कोटी लिटरचा, तरीही दिवसाआड पाणीपुरवठा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर शहर, उपनगरे यांना साधारण दररोज पाणीपुरवठा झाला पाहिजे याच अनुशंघाने शासन, प्रशासनाचे काम सुरु असते. सुयोग्य पाणी पुरवठ्यासाठी नगर महापालिकेने आजवर तीन पाणी योजनांवर २९४.१८ कोटी रुपये खर्च केलेले आहेत.

अमृत योजना राबविल्याने अतिरिक्त पाण्याची भर पडली. विशेष म्हणजे नगरच्या सुमारे ५ लाख लोकसंख्येला दररोज पाणी देण्यासाठी साडेसात कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे व सध्या दररोज १० कोटी लिटर पाणी उपलब्ध होतंय.

म्हणजेच गरजेपेक्षा अडीच कोटी लिटर जादा पाणी असूनही नगरकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी,सुविधा असूनही लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष?

केडगाव व नगर शहरासाठी पाणी योजनेची कामे झाली. नंतर अमृत योजनेतून नवीन साठवण टाकी, नवीन जलवाहिनी व जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाली. विळद येथे नवीन पंपही बसवण्यात आले. सर्व कामे पूर्ण होऊन पाणी उपसा वाढला.

फेज टू योजनेतील वितरण व्यवस्थेच्या प्रलंबित कामांमुळे पाणी उपलब्ध होऊनही नगरकरांना दररोज पाणी देता येत नाही. शहराला दररोज पाणी देण्यासाठी वितरण टाक्यातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आवश्यक आहे.

महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याबाबत सूचना देऊनही नियोजन झालेले नाही. खासदार, आमदार, महापौर सर्वांचेच याकडे दुर्लक्ष झाले आहे.

खासदार सुजय विखे यांचा दररोज पाणी देण्याचा शब्द

२७ डिसेंबर २०२२ ला पाणी योजनांच्या कामांबाबत महापालिकेत खा. विखे यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी मार्च २०२३ पासून नगरकरांना रोज पाणी मिळेल असे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.

आज (११ डिसेंबर) पुन्हा एकदा खासदार विखे यांनी आढावा बैठक आयोजित केली असून आता तरी रेग्युलर पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फेज टू पाणी योजनेचा गाजावाजा, पण सद्यस्थिती काय?

विळद ते नागापूर ६०० एमएम लाईनचे काम पूर्ण झाले आहे. निर्मलनगर येथे उंच टाकीसाठी उर्ध्ववाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. यासोबतच मुळानगर, विळद, नागापूर, वसंतटेकडी येथे पंपिंग मशिनरीचे काम पूर्ण झाले आहे. ५६५ किमी वितरण व्यवस्थापैकी ५५५ किमी काम पूर्ण झाले असून अदयाप जोडणी बाकी आहे. गुरुत्ववाहिनी अंथरणे, जोडणे आदी कामे देखील पूर्ण झाले आहे.

पाणी योजना व त्यावरील खर्चावर एक नजर

केडगाव पाणी योजनेसाठी 40 कोटी खर्च, शहर (फेज टू) साठी खर्च 40 कोटी तर अमृत पाणी योजनासाठी 138.36 कोटी खर्च झाला असल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office