अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- जिल्हा नियोजन समितीची मागील सभा गेल्या ११ महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर सभाच न झाल्याने जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करता आला नाही.
त्यामुळे पालकमंत्री नियोजन समितीची सभा कधी घेणार, असा सवाल भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.
वाकचौरे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांचे, शासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यांची दुरुस्ती, तसेच नवीन इमारती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने निधी उपलब्ध झालेला नाही. रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे.
त्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने अनेक लोकांचे बळी गेले.
जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकास आराखडयावर चर्चा होऊन अनेक शासकीय विभागांना निधीचे वितरण केले जाते, पण यावर्षी सभाच न झाल्याने आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी,
पशुसंवर्धन, नरेगा, तसेच इतर विभागांच्या योजना प्रशासनाला राबवता आलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री कधी घेणार व जिल्ह्याच्या विकासाला चालना कधी देणार? असा सवाल वाकचौरे यांनी केला.