Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी आणखी प्रतिक्षा वाढली असून गत दोन दिवसापासून पाणलोटात पावसाने विसावा घेतल्याने स्वातंत्र दिनाच्या अगोदर धरण भरण्याची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अतिमहत्वाचे धरण समजले जाते. सध्याच्या परिस्थितीत भंडारदरा धरणाला भरण्याचे गत आठ दिवसापासून वेध लागलेले आहेत. त्यातच भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दलघफु होताच धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे जाहीर होत असते.
मात्र धरण तांत्रिक दृष्ट्या भरण्यासाठी अद्यापही ३२ दलघफु पाण्याची आणखी आवश्यकता आहे. त्यातच जलसंपदा विभागाकडून धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे यावर्षी घोषित होणार नसून धरणाचा पुर्ण ११०३९ दलघफू पाणीसाठा झाल्यावरच धरण भरल्याचे गृहीत धरावे, असे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे यावर्षी तरी स्वातंत्र्य दिनापूर्वी भंडारदरा धरण भरण्याची परंपरा खंडीत होणार असल्याचे लक्षात येत आहे.भंडारदरा धरण आत्ताच्या परिस्थितीत ९५ टक्क्यांच्या आसपास भरले असून आणखी ५ टक्के पाणी धरण भरण्यासाठी आवश्यक असून धरणाच्या पाणलोटात पावसाने गत दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे.
त्यामुळे भंडारदरा धरण भरण्याची उत्तर नगर जिल्ह्यातील नागरीकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. गत चौविस तासात भंडारदरा येथे 11 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे २२ मिली मीटर पाऊस पडला आहे.
रतनवाडी येथे २३ मिली मीटर पांजरे १७ मिली मीटर तर वाकी येथे ७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४६८ दलघफु झाला असून धरण ९४.८३ टक्के भरले आहे.
विजनिर्माण केंद्रातुन ८२० क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीत वाहत आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६ हजार ९४३ दलघफु झाला असून धरण ८३.३७ टक्के भरले आहे. निळवंडे धरणातुन १ हजार ५६८ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीत वाहत आहे.